काळी

त्या आजीला पाहून गावातली एक आठवण जागी झाली, गावात एक तारी नावाची मुलगी होती, तारी आमच्या वया हुन बरीच मोठी होती, सगळे लोकं तिला काळी तारी म्हणायचे, कारण होतीच ती एकदम काळी, त्यामुळे तिचं लग्न होत नव्हते असं गावातले लोकं म्हणायचे, बाकी तारी मर मर घरातले शेतातले काम करायची, जनावरसारखं राबायची, उन्हाची पावसाची कधीच पर्वा करायची नाही, तारी हसली की तिच्या काळ्या रंगात तिचे मोत्यासारखे पांढरे शुभ्र दात अंधाऱ्या रात्री लख लखनाऱ्या विजेसारखे चमकायचे, स्वभावाने अतिशय प्रेमळ होती, एका हाकेत कुणालाही मदतीला धावत जायची, जनावरांच्या बाळंत पण करण्यात तर तिचा हातखंडा होता, कशात काही कमी नव्हती फक्त देवाने तिला तसा रंग दिला होता त्यात तिचा काहीच दोष नव्हता, बिचारी तारी तिच्या बरोबरीच्या पोरींना दोन दोन पोरं झाली तरी तशीच होती, आता पण असेल का? का झाले असेल तारीच लग्न? मनात हजारो प्रश्न येत होते, पूर्वी पण एखाद्या माणसाची पारख रंगावरून होयची पण आता तरी काय बदलली परिस्थिती? पाच दिवसात गोरं बनवण्याच्या दावा करत कित्येक कंपन्या करोडोची उलाढाल करतात, जाहिराती पाहिल्या की असं वाटतं, तुमचा रंग गोरा असेल तर कशी दुनिया मूठ्ठी मध्ये येते असं सांगतात, तुमच्याकडे सगळं आहे आणि रंग जर गोरा नसेल तर तुमच्याकडे काहीच नाही, तुमची काही किंमत नाही, तुम्हाला कुणी विचारणार नाही, ह्या गोऱ्या चमडीसाठी लोकं हजारो रुपये खर्च करतात, खरंच माणसाच्या आरश्यासारख्या लखलखीत मनाला काहीच किंमत नाही का? कधी सोडून देणार आम्ही गोऱ्या रंगाचा हट्ट? आज तारीची आठवण आली, उंच, शिडशिडीत बांध्याची तारी एखाद्या ब्युटी काँटेस्ट मद्ये उतरली असती तर नक्कीच मिस वर्ल्ड झाली असती. आम्ही कितीही सुधारलो, कितीही प्रगती झाली, जगात कुठे हि गेलो तरी आमची मानसिकता बदलणार नाही, लग्नाच्या बाजारात जेव्हा मुलगा मुलगी उभी राहतात तेव्हा बायो डाटा मध्ये मुलीला तिच्या नावानंतर लगेच तिच्या रंगाबद्दल लिहणे गरजेचे असते, जसं की, मुलीचे नाव कु. — —- —- रंग – गोरा किंवा सावळा, गव्हाळ वैगेरे वगैरे आणि मुलाच्या बायो डाटा मध्ये त्याची इच्छा असते मुलगी गोरी हवी. मग हा बैल कितीही काळा सावळा असू दे त्याला मुलगी मात्र गोरीच हवी. बदलेल का आमची मानसिकता कधी?

Advertisements

काळी

रस्त्यावरून जाताना अधून मधून तुरळक कुणीतरी माणूसजात दिसायची, गालफड आत गेलेली, फाटक्या कपड्यानी कसे तरी अंग झाकण्याचा प्रयन्त केलेला, लहान, थोर, बायका एक जात तशीच, डोक्यावर सुक्या झुडपाची मोळी, रंग एकदम उन्हात, कामांनं आणि परिस्थितीनं रापलेला, काळवंडलेला, कुणाचा एकदम काळा कुट्ट, खेड्यात अजूनही जगण्यासाठी प्राणांकीत धडपड करावी लागते, दोन वेळच्या घासासाठी मरमर करावी लागते, देशाची खरी परिस्थिती तर खेड्यात गेल्यावर समजते, आपण म्हणतो ते डिजिटल आणि ग्लोबल फक्त वर वर आहे हे एका खेड्यात गेल्यावर समजते, आपल्या देशातली खरी परिस्थिती खेड्यातून पाहीली की स्वतःलाच स्वतःची लाज वाटल्याशिवाय राहणार नाही, अन्नाच्या एका घासासाठी आणि पाण्याच्या थेंबासाठी तरसणारे आपलेच बंधू भगिनी पाहिले की मन हेलावजन जाते, एक आजी एकदम कम्बरेत वाकून चालत होत्या, त्यांच्या काखेत एक गाठोडं होतं, सगळ्या अंगावर सुरकुत्या, किती तरी पावसाळे उन्हाळे पाहिलेल्या अंगभर खुणा, एकट्याच हळू हळू चालत होत्या, माझी गाडी त्यांना ओव्हर टेक करून पुढे आली, त्या आपल्या कासवगतींन चालत होत्या, मी गाडी थांबवली, दहा मिनिटं लागली त्यांना माझ्या पर्यंत पोहचायला, मी खाली उतरून आजी ला म्हणले,” आजी बसा गाडीत, मी सोडतो तुम्हाला घरी?” आजी नको होय नको होय करत बसल्या, घर कुठं आहे विचारलं तर लांब बोट करून दाखवलं, मला फक्त एक रंगीत ठिपका दिसला, आजीचं घर आलं, एक छोटीशी झोपडी, आजीनं तिच्या प्रेमानं घामानं निर्माण केलेली, अजून कुणी तिथं दिसेलच नाही, मी त्यांना गाडीतून उतरायला मदत केली, आजीने माझ्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवला, आशिर्वाद देण्यासाठी हात माझ्या डोक्यावर ठेवला, बाकी शब्द फुटले नाहीत कारण डोळ्यातून पाणी घळ घळ करत तिच्या सुरकुतलेल्या गालावरून ओघळत होतं, मी निशब्दपणे गाडी सुरु केली, आजीला एकदा बाय बाय चा हात उंचावला, मन जड झालं होतं आणि माझा कंठ उगीचच दाटून आल्या सारखा वाटला.

गावबाहेरची नदी

माझ्या गावाच्या बाहेरून एक छोटी नदी वाहते, उन्हाळ्यातही त्या नदीमधये दोन तीन ठिकाणी मोठे डोह होते त्यात पाणी असायचं, पावसाळा येईपर्यंत त्या डोहातलं पाणी जनावरांना, बाकीच्या कामाला पुरायचं, आम्ही सगळी पोरं त्या डोहात तासन तास म्हशीं बरोबर डुंबत रहायचो, शाळेला सुट्ट्या लागलेल्या असायच्या, काय मस्त मज्जा यायची, डोहाच्या वरती मोठ्या झाडाच्या फांद्या येत त्यामुळे पाणी सावलीत एकदम थंड रहात असे, आज ही ती नदी गावाची तहान भागवत पुढे जात असेल का? आज ही डोहात पाणी थांबत असेल का?

माझ्या मुलांना समर हॉलिडे लागला की मी त्यांना मुद्दाम स्विमिंग क्लास लावतो, दोघेही माझ्यावर खूप चिडतात, त्यांना आवडत नाही पण मलाच वाटते की मुलांना आणि मुलींना पण पोहायला यायला हवे, त्या स्विमिंग टॅंक च्या गुडघाभर पाण्यात पण केवढी घाबरतात मुले, केवढी रडून गोंधळ घालतात, आम्ही मात्र लहानपणापासून त्या डोहात उड्या मारायचो, कुणी कुणाच्या घरच्यांनी पोहायला शिकवलेलंच आठवत नाही, आम्ही सगळे मिळून स्वतः शिकलो, काही मित्र तर एकदम पट्टीचे पोहणारे होते,

गावाची मजाच न्यारी

आंब्याचं झाड

पूर्वी गावात कुणाला आंबे विकत घ्यावे लागायचे नाहीत, प्रत्येकाच्या शेतात, घराच्या परसात आंब्याची झाडं असायची, आंब्याच्या दिवसात घरोघर आंब्याचा गोड दरवळ सुटलेला असायचा, पूर्वी आंबे फक्त आणि फक्त नैसर्गिक पद्धतीनेच आडी मद्ये पिकवले जायचे, आत्ता सारखे केमिकल मद्ये किंवा कार्पेट मद्ये नव्हते, मी खूप नशीबवान होतो मला नैसर्गिक पिकवलेले आंबे खायला मिळाले, पाड लागला की आंबे काढणी होयची, रस्तोरस्ती उंच बांबू आणि त्याला लावलेली सुतलीची जाळी घेऊन लोकं दिसायची, आंबे नाजूक फळ असल्यामुळे त्याला उतरवणारे एक्स्पर्ट गावागावात असायचे, आंबे जमिनीवर पडले की खराब होत, आंब्यांना अलगद त्या जाळीत झेलावं लागायचं, आंबे उतरवणे म्हणजे आमच्या सारख्या लहान पोरांना एक मोठी गंमत असायची, पूर्ण दिवस त्यातच निघायचा, आंबे उतरण्या आधीच हिरवे राघू पाडाचे आंबे अचूक शोधायचे, त्या दिवसात हिरव्या पोपटाचे थवे च्या थवे आंब्या च्या झाडावर असायचे, एखाद्या चुकार पोपटकडून अर्धवट खाल्लेला पाडाचा वरून हिरव्या सालीचा पण आतून केशरी गोड रसाळ उरलेला पोपटाचा उस्टा आंबा खाली पडायचा आणि तो उचलून खाण्यात आमची झुंबड उडायची, आ!! हा!! हा!! काय चव असायची, अजूनही जिभेवर रेंगाळते, त्यावेळी आंबे कुणी सुरीने कापून खात नव्हते, कपडे सगळ्यांचेच आंब्याच्या रसाने कायमचे पिवळे झालेले असायचे पण डाग पडले म्हणून कुणी तेव्हा कधीच रागवत नसायचे.

आज प्रश्न पडतो मला, माझ्या कॉन्व्हेंट मध्ये शिकणाऱ्या मुलांना कसे समजावू मी पाडाचा आंबा कसा लागतो ते? त्याची चव कशी देऊ मी? बाराव्या मजल्यावरच्या फ्लॅट मद्ये राहताना हिरव्या राघू चा आकाशात मनसोक्त विहार करणारा हिरवागार पोपटाचा थवा? काय सांगू त्या आंब्याच्या हिरव्या कोवळ्या मोहराचा गोड सुगंध? मुले गुगल वरून सगळी इम्फो सर्च करतीलच पण अनुभव कधीच घेऊ शकणार नाहीत का?? आज दोन हजार खर्च करून घरात जेव्हा मी आंब्याची पेटी आणतो तेव्हा आंबा नाकाजवळ घेऊन मोठ्याने वास घेऊन पहातो पण अजूनही तो वास येत नाही, नैसर्गिक पणे पिकवलेले आंबेहणून हजारो रुपये मोजतो बारा आंब्यांसाठी पण तरीही घरात आंब्याचा दरवळ सुटत नाही याची खंत मात्र मनाला लागून राहते दरवर्षी आंब्याच्या मोसमात, आणि मग तेव्हा मन घिरट्या घालू लागत हजारो किलोमीटर दूर असलेल्या माझ्या गावातल्या हिरव्यागार आंब्याच्या झाडाभोवती, आंब्याच्या भाराने लगडलेल्या फांद्या आणि तो हिरव्या पोपटांचा थवा., कसे तरी ते आठवत आठवत पेटीतले महागडे आंबे व्यवस्थित सुरीने कापून खातो कपड्यावर पिवळे डाग पडणार नाहीत याची काळजी घेत घेत.

गाय बैल

आज गावी जाताना विचारांचे काहूर माजले माझ्या मनात, मागच्या वेळी जसं गाव होतं तसेच असेल का? तसेच दिसेल का? लहानपणीच्या गावाच्या आठवणिनी माझ्या मनात धूळ उडवून दिली आहे, रस्तावर पण धुळीचे लोट उडत आहेत, आज जेव्हा माझी गाडी गावात प्रवेश करेल तेव्हा येतील का आवाज गाई बैलाच्या गळ्यातल्या घंटीचा?, कुण्या गाईचा बछडा धावेल का अवखळपणे माझ्या समोरून? आणि उठेल धांदल त्याला पकडण्यासाठी त्याच्या मालकाची? अण्णा आणि तात्या आज ही दिसतील का वडाच्या पारावर गप्पा मारताना?

माझं sofisticated Life

गावी जाऊन खूप वर्षे झाली, कामाने काही जमलेच नाही का मी जमवून आणले नाही हा एक प्रश्नच आहे, बायकोचा जॉब, मुलांची एक्साम, मी सुट्टी घेतली तर माझ्या प्रोजेक्ट चे काय होणार? आलिशान फ्लॅट घेतलाय त्याच्या इ एम आय चं काय होणार?? असा विचार करून 7 वर्षे होत आली बहुतेक मी गावी गेलो नाही,

सुगरणीचं घरटं

पूर्वी माझा वर्ग मित्र सदाशिवच्या शेतात एका नारळाच्या झाडाला सुगरणीची खूप घरटी असायची, छोटी नाजूक सुगरण तिच्या इवल्याश्या चोचीत गवताच्या काड्या आणताना दिसायची, तिची ती आपल्या अजून न जन्मलेल्या पिल्लांसाठी घरटं तयार करण्याची धडपड, गवताच्या काड्या कुठून कुठून घेऊन येणं, पुन्हा जाणं, मी आणि सदा तासन तास तिचं हे जगणं एकटक पहायचो, ती आम्हाला काड्या घेऊन येताना दिसायची, हिरव्या झाडामध्ये थोडावेळ लुप्त होऊन जायची अन पुन्हा अचानक झाडा मधून बाहेर उडत जाताना दिसायची, अविरतपणे तिचे ते काम चालू असायचे, खरंच कर्म कुणाला चुकलेलं नाही, परमेश्वराने प्रत्येकालाच काही न काही कर्म दिले आहे, आणि फळाची इच्छा न धरता ते कर्म प्रामाणिकपणे केलेच पाहिजे, हे मला आत्ता आत्ता समजून चुकले, लहानपणी निरागस भावनांशिवाय मनात काहीच नसायचं. प्रारब्ध ना सुगरणीचं चुकलं ना माझं.

घरटं

चिंचेचे झाड

माझी गाडी गावच्या खडबडीत रस्त्यावरून धावत होती, इतकी वर्षे झाली पण रस्ता मात्र अजून आहे तसाच आहे की!! याचा अर्थ सरकार कुणाचंही असू दे गावं आहे तशीच राहणार की काय!(?), या रस्ता सारखं अजूनही काही गोष्टी तशाच असतील का? जश्या पूर्वी होत्या? डोंगरावरच महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागे असणारे नेहमी चिंचेच्या भाराने वाकलेले मोठं जुनं झाड, आज ही तसेच हिरव्या चिंचेने वाकल्या असतील का त्याच्या फांद्या??

चिंचेच्या भाराने वाकलेली फांदी
Create your website at WordPress.com
Get started